‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारप्राप्त विनायक जाधव यांचा हृद्य सत्कार!

तळेरे (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती ओझरम-तीर्थवाडी, तालुका – कणकवली यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत या वर्षीचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारप्राप्त ओझरम शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक विनायक जाधव, कासार्डे विभाग केंद्रप्रमुख संजय पवार तसेच ओझरम गावातील तिन्ही शाळांतील सर्व शिक्षक-शिक्षिकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे कासार्डे विभाग केंद्रप्रमुख शिक्षक संजय पवार सर यांनी आपल्या भाषणात,विनायक जाधव सर यांच्या कार्याचे कौतुक करत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिलेल्या पुरस्काराबद्दल जाधव सरांचे व शिक्षण विभागाचे आभार मानले. वसतिगृह दक्षता समितीचे सचिव दिनेश ऊर्फ बंडू राणे यांनी आपल्या भाषणात, शिक्षक हे बालपणीच मुलांवर सुसंस्कार घडवून नवीन सुसंस्कृत पिढी तयार करत असतात व आपल्या गावातील सर्वच शिक्षक याचे अनुकरण करीत आहेत ही गावासाठी व शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठीही अभिमानास्पद बाब आहे व नवीन पिढी घडवण्यात शिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे, असे सांगितले.

या कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक विनायक जाधव यांनी आपल्या भाषणात, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून ओझरममधील सर्व ग्रामस्थांचा हा पुरस्कार आहे. तुम्हां सर्वांच्या एकजुटीमुळे मला काम करण्यास प्रोत्साहन मिळते. सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो व आपली शाळा नेहमीच प्रगतीपथावर राहील यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करेन, असे नमूद केले.

या कार्यक्रमात जितेंद्र राणे, सरपंच समृद्धी राणे, माजी पंचायत सभापती विनायक राणे, दिनेश राणे, गणेश राणे, एल. डी. राणे यांनी आपल्या भाषणात श्री. जाधव सर यांच्या कार्याचे कौतुक करून गौरवोद्गगार काढले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदाशिव राणे,नितीन राणे, अशोक राणे, रेश राणे, दिव्या राणे, दूर्वा राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!