कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील राधाकृष्ण मंदिरात आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. पुढील सात प्रहर अखंड सप्ताह चालू राहणार आहे. विशेष म्हणजे या धार्मिक परंपरेला यंदा १२० वर्षे पूर्ण होत आहेत.
फोंडाघाट बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले हे मंदिर फोंडाघाटवासीयांचे श्रद्धास्थान मानले जाते. मंदिरात राधाकृष्णाबरोबरच गणपतीची सुबक मूर्तीही विराजमान आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आर. के. ग्रुपतर्फे सलग तीन दिवस भजन कार्यक्रम होणार असून नामवंत भजनकार त्यात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या भजनातून प्रथम तीन क्रमांक जाहीर करण्यात येऊन सत्याहाच्या शेवटच्या दिवशी विजेत्यांना भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. वैश्य समाज मंडळ या अखंड सप्ताहाचे नियोजन व आयोजन करीत असून व्यापारी दररोज सकाळी मंदिरात दर्शन घेऊनच आपली दुकाने उघडतात.

सप्ताहाच्या काळात संपूर्ण बाजारपेठ दिव्यांनी उजळून निघते. सातव्या दिवशी मारुती मंदिरात सप्ताहाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी पटेल मानकरी नियोजन पाहतात. तेथे रात्री डबलबारीचा जंगी कार्यक्रम रंगतो. तसेच श्री. राधाकृष्ण मंदिरात हळदीकुंकू, डबल बारी, कमानी, फुगड्या, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, हरीपाठ, वामनराव पै तसेच श्री. पारकर बुवा यांचे कलावती आईचे भजन असे अनेक कार्यक्रम यावेळी होणार आहेत. हायस्कूल व बाळगोपाळ मंडळाची दिंडीही सप्ताहाचे आकर्षण ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हाभरातून भजनपथके येथे येतात. अखेरच्या सातव्या दिवशी राधाकृष्ण व मारुती यांची पालखीभेट होऊन सप्ताहाची सांगता होते.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे नेहमीप्रमाणे यथाशक्ती योगदान असते. विशेष म्हणजे यावर्षी पालकमंत्री नितेश राणे सप्ताहाच्या कार्यक्रमाला भेट देणार आहेत. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा आस्वाद सर्व भक्तजनांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अजित नाडकर्णी तसेच वैश्य समाज मंडळामार्फत करण्यात आले आहे.












