कुडाळ मध्ये पकडला लाखोंचा गुटखा; एलसीबी ची कारवाई

करोल बंधूंसह चौघांवर गुन्हा दाखल

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ बाजारपेठ मधील राधिका कोल्ड्रिंक्स हाऊसच्या बाजूच्या पान टपरीमधून २ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा अवैध गुटखा एलसीबी च्या पथकाने पकडला. ही कारवाई शनिवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी करण्यात आली. या गुन्ह्यात चौघांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इम्रान शमशुद्दीन करोल, इम्तियाज शमशुद्दीन करोल (दोघे रा. करोलवाडी, कुडाळ) यांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की कुडाळ बाजारपेठ मध्ये अवैध गुटखा साठा असल्याची खबर एलसीबी च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, हवालदार आशिष जामदार यांनी सदर पान टपरीवर छापा मारला. छाप्यात तब्बल २ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा अवैध गुटखा साठा आढळून आला. घटनास्थळी इम्रान करोल आणि इम्तियाज करोल याना पकडून कुडाळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच इम्रान करोल आणि इम्तियाज करोल सह आरिफ करोल (रा. शिवाजीनगर, कुडाळ), समीर पठाण (रा. हुबळी, कर्नाटक) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!