कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे जिमखाना विभागातर्फे मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन – ४ ची बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा तारीख २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दरम्यान पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य जगन्नाथ वळंजू, कोकण झोनचे समन्वयक शशांक उपशेट्ये, ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. राजेद्र मुंबरकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. हेमंत गावित उपस्थित होते.
यावेळी शशांक उपशेट्ये यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना बुद्धीबळ हा बुद्धीला चालना देणारा खेळ असल्याचे सांगितले. तर संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी “बुद्धीबळ हा खेळ जीवनाकडे बघण्याचे तत्त्वज्ञान शिकवणारा असल्याने विद्यार्थ्यांनी या खेळाकडे वळावे” असे मत व्यक्त केले.
या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा प्राचार्य युवराज महालिंगे याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
ही स्पर्धा दोन दिवस सुरू होती. या स्पर्धेत बुद्धीबळ पुरूष वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक नारकर साहस (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण), द्वितीय क्रमांक नारकर श्रीहास (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण), तृतीय क्रमांक तांडेल विपुल (डीयूबीएसएससी ,दापोली) तर बुद्धीबळ पुरुष संघ प्रथम क्रमांक डी. बी. जे. कॉलेज चिपळूण, द्वितीय क्रमांक जे. एस. एम. कॉलेज अलिबाग आणि तृतीय क्रमांक डियूबीएसएससी दापोली यानी पटकावला. तसेच बुद्धीबळ महिला वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक विश्वकर्मा खुशी (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण), द्वितीय क्रमांक पनवेलकर शर्वरी (डीयूबीएसएससी, दापोली), तृतीय क्रमांक गुरव अनुश्री (जीडीकेसीसी, अलिबाग) तर बुद्धीबळ महिला संघ प्रथम क्रमांक आर. पी. गोगटे कॉलेज रत्नागिरी, द्वितीय क्रमांक वायबीआयटी कॉलेज सावंतवाडी, तृतीय क्रमांक डीयूबीएसएससी कॉलेज दापोली यांनी प्राप्त केला. स्पर्धेचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील जिमखाना विभाग तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंबरकर तर सूत्रसंचालन प्रा. सचिन दर्पे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. हेमंत गावित यांनी मानले. या स्पर्धेत २६ महाविद्यालयांचे १०८ विद्यार्थी या स्पर्धेत बुद्धिबळपटू म्हणून सहभागी होते.












