कनेडी राड्याप्रकरणी आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

संशयित आरोपींनी जमावाला भडकावल्याचा आरोप

कणकवली (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वीच कनेडी येथे झालेल्या राड्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल असलेल्या आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी मंजूर केला आहे. या तीनही संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला. 24 जानेवारी 2023 रोजी माघी गणेश जयंती ची तयारी सुरू असताना या अनुषंगाने या गुन्हयातील आरोपी कुणाल सावंत याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मारहाण केली. या झटापटीत गोट्या सावंत यांचा आयफोन चोरून नेला. त्यानुसार याप्रकरणी गोट्या सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांच्या सांगण्याने जमावाला उद्युप्त करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला व राडा घडविण्या साठी या तिघांनी जमावाला उद्युप्त केले अशी फिर्याद माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी दिली होती. या दरम्यान आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन पोलीस व इतरांना धमकावण्याचा व भडकवण्याचा प्रयत्न करत होते. आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हया पारकर यांनी जमावाला उद्युप्त केल्याने गोट्या सावंत यांना जबर मारहाण करण्यात आली. यामुळे गोट्या सावंत यांच्या छाती, पाय, हाताला गंभीर दुखापत केली व मृत्यू होऊ शकेल इथपर्यंत मारहाण केली. त्यानुसार भादवि कलम 307, 392, 324, 323, 147, 143, 148, 149 नुसार आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांच्याकडे अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार या अर्जावर सुनावणी होत या तिघांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी न्यायालयासमोर यशस्वी युक्तीवाद केला.

error: Content is protected !!