वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षिरसागर यांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा
बांदा (प्रतिनिधी): कोकण रेल्वे मार्गावर मडुरा काळा आंब्याजवळ पहाटेच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलदगती रेल्वेची धडक बसून तीन गवे ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. मंगळवारी पहाटे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस रेल्वे गाडीची धडक तीन गव्यांना बसली. यात चार वर्षाची मादी, दीड वर्षाचे बासरू जागीच ठार झाले. तर एक मोठा अंदाजे पाच वर्षांचा गवा रेडा गंभीर जखमी झाला. जखमी गवा रेल्वे मार्गालगत असलेल्या काजू बागेत सुमारे चार तास तडफडत होता. मात्र, धडक जोरात बसल्याने अखेर त्याने आपले प्राण सोडले. सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनपाल नागेश खोराटे, वनरक्षक संग्राम पाटील, राठोड, चंद्रकांत पडते, ग्रामस्थ रामदास केणी यांनी मृत गव्यांचा पंचनामा करत विल्हेवाट लावली. दरम्यान रेल्वे मार्गावर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने संरक्षक जाळी अथवा कुंपण बसविणे आवश्यक आहे. या संदर्भात लवकरच पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सांगितले.