फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेची इयत्ता नववीमध्ये शिकणारी मनस्या फाले हिने दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्थल सैनिक कॅम्प सर्व्हीस शूटींग स्पर्धेत सहभागी होऊन दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त करून आपल्याबरोबरच फोंडाघाटच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला आहे. या निमित्ताने फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभा शाखा फोंडाघाट यांचे वतीने ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून फोंडाघाटच्या या सुवर्ण कन्येचा सत्कार समारंभ फोंडाघाट सिद्धार्थनगर येथील नालंदा बुद्ध विहारात आयोजित करण्यात आला होता.
फोंडाघाट बौद्ध विकास मंडळामार्फत ६९वा धम्मचक्र परिवर्तन दिन मंडळाचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मनस्या हिचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ती म्हणाली की, आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी, प्रयत्न, जिद्द व आत्मविश्वास महत्त्वाचा असतो व त्या जोरावरच मी आजवरचं हे यश संपादन केलं. या माझ्या यशात प्रामुख्याने माझे आई वडील, विद्यालयाच्या भोगले मॅडम, मुख्याध्यापक, संस्था चालक या सर्वांच्या पाठिंब्यावर व प्रोत्साहनामुळेच मी हे यश मिळवू शकले. मनस्याने एवढ्या लहान वयात संपादन केलेले यश व तिने दिलेला संदेश सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावणारा व आयुष्यात आपले ध्येय साध्य करण्यासाठी बळ देणारा आहे, असे उद्गगार मंडळाचे माजी अध्यक्ष संजय तांबे यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष आखाडे यांनी केले. सत्कार समारंभ तिचे वडील निलेश फाले, मंडळाचे अध्यक्ष जयवंत जाधव, संजय तांबे, मिलिंद जाधव, संचिता जाधव व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या निमित्ताने तिला जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील ग्रंथ भेट देण्यात आला.












