खारेपाटण पंचशील नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

१०वी, १२वी गुणवंत विद्यार्थ्यांसह कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने अशोका विजयादशमी तथा ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन पंचशील नगर खारेपाटण येथील बुद्ध विहारात स्थानिक मंडळाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे, जि.प. केंद्र शाळा खारेपाटणचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, खारेपाटण येथील महिला बचत गट प्रभाग संघाचे प्रभाग समन्वयक अमोल गराडकर, आरोग्य सेवक संतोष जुवाटकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव सागर पोमेडकर, संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्ष संकिता पाटणकर सचिव आस्था पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पंचशील ध्वजारोहण करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर बुद्धविहार येथील भगवान बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक धार्मिक बौद्धपूजा पूजापाठ घेण्यात आला. यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेतला.

यावेळी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवं. प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ इयत्ता १०वी /१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांच्या सौजन्याने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर खारेपाटण येथील ग्रामस्थ राजेंद्र गणपत ब्रम्हदंडे यांच्या दिवं. पत्नी वीणा राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी मरणोत्तर अवयव दान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचा पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष भरत पाटणकर व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्ष संकिता पाटणकर यांच्या शुभहस्ते मंडळाच्या वतीने पती राजेंद्र ब्रम्हदंडे व पुत्र सचिन ब्रम्हदंडे यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. तर खारेपाटण जि.प. केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे यांनी नुकतीच एम. पी. एस. सी. स्पर्धा यशस्वी उत्तीर्ण केल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा देखील शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

बौद्ध समाज बांधवांनी अवयवदान करण्याची प्रेरणा जनतेमध्ये वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आज अशोक विजयादशमीनिमित्त माझा, कुटुंबीयांचा सत्कार केला याबदल मी खूप ऋणी आहे. भगवान बुद्धांच्या पंचशील तत्त्वांचे पालन समाजाने करावे व आपले जीवन समृद्ध करावे. मात्र अवयवदान करणाऱ्या व्यक्ती व कुटुंब यांना शासन दरबारी न्याय काय? सरकार व आरोग्य खात्याने त्यांच्या समस्या जाणून घेतल्यास अवयव दानाची चळवळ अधिक जोमाने वाढण्यास वेळ लागणार नाही, असे भावपूर्ण उद्गार राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी याप्रसंगी काढले.

यावेळी प्राथमिक शिक्षक मिलिंद सरकटे व महिला बचत गट समूह प्रभाग समन्वयक अमोल गराडकर यांनी देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

सायंकाळी लहान मुले व महिलांचे विविध फनी गेम्स कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते संतोष तुरळकर, धीरज जुमलेकर, अमित पाटणकर, संदेश पाटणकर, संदीप पाटणकर, प्रथमेश कदम, मकरंद पाटणकर, बाळकृष्ण पाटणकर, ललित पाटणकर, पार्थिव पाटणकर, श्रवण पाटणकर, कुणाल पाटणकर याणी मेहनत घेतली. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी केले तर सर्वांचे आभार मंडळाचे सचिव सागर पोमेडकर यांनी मानले.

error: Content is protected !!