जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी सावंतवाडीतील निराधार वयोवृद्धास संविता आश्रमात आश्रय

खारेपाटण (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील भाट पेट्रोल पंप येथे रात्री १०:३० वाजता निराधार अवस्थेत आढळून आलेल्या प्रकाश राणोजी राजपूत अंदाजे वय ८० वर्षे या ज्येष्ठ नागरिकास आज जीवनाचा नवा आधार मिळाला असून जीवन आनंद संस्था आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने ही मदत त्यांना देण्यास शक्य झाले आहे.

प्रकाश राणोजी राजपूत हे वयोवृद्ध व्यक्ती सावंतवाडी येथे रस्त्यावर अन्न-पाण्याविना हाल अपेष्टा सहन करत असल्याचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवि जाधव आणि लक्ष्मण कदम यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचेशी संपर्क साधून राणोजी यांना पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करून घेण्यास मदत केली. या ज्येष्ठ नागरिकास संविता आश्रमात अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सेवा त्वरित पुरवण्यात आली असून आश्रमातील सेवा कार्यकर्ते त्यांची सर्वोत्तोपरी काळजी घेत आहेत.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त भूमिकेबद्दल समाधान व्यक्त करत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब म्हणाले, “रस्त्यावर असलेल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना समाजात सन्मानाने जीवन जगता यावं, ही आमची जबाबदारी आहे. हे व्रत आम्ही अखंडपणे सुरू ठेवणार आहोत.”

संवेदनशील कार्यकर्त्यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी एका निराधार बांधवास आश्रय मिळवून देण्यासाठी केलेल्या या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेळेवरची अशी एखाद्याची कृती समाजात सामाजिक जाणीवेची संवेदनशील भावना वाढीस लावून अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

error: Content is protected !!