अनु. जाती प्रवर्गातील सुमारे ३५ लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत व महाराष्ट्र शासन उद्योजकता विकास केंद्र (MCED) तसेच संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक विकासावर आधारित खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार युवक युवती व पुरुष – महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सुमारे १ महिना कालावधीच्या कुक्कुट पालन प्रशिक्षण शिबिराचा समारोप नुकताच जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
स्वयंरोजगार मार्गदर्शन कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यशाळेत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विशेष घटकातील सुमारे ३५ प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यापैकी किमान २५ लाभार्थी नवीन उद्योजक बनू पाहत आहेत तर या लाभार्थ्यांची (CMEGP) मध्ये कर्ज प्रकरणे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा उद्योग समन्वयक सुषमा साखरे यांनी दिली.

खारेपाटण बुद्धविहार येथे संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्ष संकिता पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली व खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते शिबिराचा शुभारंभ १ महिन्यापूर्वी करण्यात आला होता. तर या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक कोमल माने, समन्वयक सुषमा साखरकर, व्यवस्थापक श्री. शिंगटे, पं.स. कुडाळ आरोग्य विभागाचे श्री. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्ष संकिता पाटणकर, महिला बचत गटाच्या सी. आर. पी. आस्था पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे सचिव सागर पोमेडकर, कुकुट्टपालन प्रशिक्षण वर्गाच्या मार्गदर्शक शिक्षक शर्मिन काझी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या शिबिराला उपस्थित सर्व मान्यवरांचे जिल्हा उद्योग समन्वयक सुषमा साखरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र शासन उद्योजकता विकास केंद्राच्या विविध उद्योग व्यवसाय योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी देखील उपस्थितांना माहिती देऊन या संधीचा लाभ बेरोजगार युवक युवतींनी घेऊन चांगले उद्योजक बना, असे आवाहन यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक निकिता माने यांनी प्रशिक्षण लाभार्थ्यांना केले.
या एक महिन्याच्या प्रशिक्षण शिबिराला खारेपाटण दशक्रोशोतील महिला युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आस्था पाटणकर यांनी केले.












