९३ लाखाच्या अवैध दारुसह दोन आरोपीना अटक

एक्साईज इन्सुली चेक पोस्ट पथकाची मोठी कारवाई

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली तपासणी नाका येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मध्यरात्री कारवाई करून बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वाहन चालक रामनिवास (वय २५, रा. बाडमेर, राजस्थान) आणि नूर आलम (वय २६, रा. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाका परिसरात पथकाने सापळा रचला. गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या बाराचाकी कंटेनरची तपासणी केल्यावर त्यामध्ये गोवा बनावटीच्या रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की या विदेशी मद्याचा मोठा साठा आढळला.

कंटेनरमध्ये प्रत्येकी १८० मि.ली. क्षमतेच्या ४८ सीलबंद बाटल्यांचे १५०० कागदी बॉक्स आढळले — एकूण ७२,००० बाटल्या. या अवैध मद्यसाठ्याची किंमत अंदाजे ९३ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अंदाजे १५ लाख रुपयांचा कंटेनर आणि २० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

या कारवाईचे मार्गदर्शन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय आयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले. ही कारवाई दुय्यम निरीक्षक विवेक कदम, वाहन चालक रणजीत शिंदे, जवान दीपक वायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सूर्यवंशी यांच्या सहभागाने पार पडली.

या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.

error: Content is protected !!