गुरांची अवैध वाहतूक : एकावर गुन्हा दाखल

वैभववाडी पोलिसांची कारवाई

वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरांची अवैद्य वाहतूक करणाऱ्या राधानगरी येथील युवकाला वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर अशोक थोरवत वय ४२ रा. कासारवाडा ता. राधानगरी असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. वैभववाडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही कारवाई सोमवारी रात्री ९:३० वा. भुईबावडा घाटात केली आहे.

भुईबावडा घाट मार्गातून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात नाकाबंदी केली. तपासणी करीत असताना एक टेम्पो ( एमएच ०९- एम – ७२२७) तेथे आला. या टेम्पोतून दोन खिल्लारी जातीचे बैल असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तो टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोत वीस हजार रुपये किंमतीचे दोन बैल होते. सागर अशोक थोरवत हा युवक कोल्हापूरकडे घेऊन निघाला होता.

पोलीसांनी दोन बैल व टेंपो ताब्यात घेतला. थोरवत यांच्यावर गुरांची अवैध्य वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन पाटील, हरीश जायभाय, रणजीत दबडे, रघुनाथ जांभळे यांनी केली आहे.

जप्त केलेले बैल खांबाळे येथील गोशाळेमध्ये देखभालीसाठी ठेवण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!