कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ आणि ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम यशस्वी केला आहे. नागरिकांचे अत्यंत महत्त्वाचे असलेले वय अधिवास दाखले, जातीचे दाखले, शेतकरी ओळखपत्र थेट ग्रामपंचायत स्तरावरच वितरित करून प्रशासकीय कामाची गती वाढवली आहे.
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’ च्या धोरणाला अनुसरून घोणसरी ग्रामपंचायतीने दाखल्यांसाठी नागरिकांना तालुका किंवा उपविभागीय कार्यालयापर्यंत ये-जा करण्याची गरज कमी केली आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या निर्देशानुसार, घोणसरी ग्रामपंचायतीने स्थानिक स्तरावर दाखले वितरण सुरू केल्यामुळे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचला आहे. विशेषत: शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी लागणारे हे दाखले त्वरित मिळाल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. या द्वारे ‘सुशासन युक्त गाव’ आणि ‘सेवा हमी कायद्याची’ अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात आहे. सरपंच प्रसाद राणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते लाभार्थीना दाखले वितरित करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी, सी. एस. सी. केंद्र चालक व्हेलेरियन पिंटो, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी दिलेल्या योगदानामुळे शासनाचा सेवा पंधरवड्यामागील ‘जनतेच्या सेवेसाठी’ हा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला आहे. या वेळी ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












