फोंडाघाट मार्गे एसटी वाहतूक बंद ; मात्र कंटेनर, चिरे, वाळू ची अवजड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू ?

प्रवाशांना गगनबावडा मार्गे प्रवासाचा नाहक भुर्दंड

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : फोंडाघाट मार्गे कोल्हापूर ला जाणारी एसटी वाहतूक 1 एप्रिलपासून 31 मे 2023 पर्यंत दाजीपूर ते राधानगरी रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण कामासाठी बंद करण्यात आली आहे. मात्र मंगळवार दि 18 एप्रिलपासून फोंडाघाट मार्गातून अवजड वाहतूक करणारे कंटेनर, चिरे, वाळू, सिलिका वाहतूक करणारे ट्रकची मात्र खुलेआम वाहतूक सुरू झाली आहे. एकीकडे एसटी वाहतूक बंद असताना दुसरीकडे खाजगी कंटेनर, अवजड वाहनांची वाहतूक कशी आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.31 मे पर्यंत रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण कामासाठी दाजीपूर ते राधानगरी वाहतूक बंद असल्यामुळे फोंडाघाट मार्गे मागील 5 दिवस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीने अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण ? फोंडाघाट मार्गे सुरू असलेल्या या अवजड वाहनांच्या वाहतुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस दल, जिल्हा वाहतूक शाखा , जिल्हाधिकारी आळा घालणार की नाही ? हा सवाल जनतेतून विचारला जात आहे. फोंडाघाट मार्गे एसटी वाहतूक बंद असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र वैभववाडी मार्गे लांबचा पल्ला गाठून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.देवगड निपाणी मार्गावरील दाजीपूर ते राधानगरी दरम्यान मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार दाजीपूर ते राधानगरी मार्गवरील एसटी वाहतूक एसटी प्रशासनाने 1 एप्रिलपासून 31 मे 2023 पर्यंत बंद ठेवली आहे. त्यामुळे साहजिकच फोंडाघाट मार्गे घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसून व्हाया गगनबावडा मार्गे प्रवास करावा लागत आहे. एकीकडे एसटी वाहतूक फोंडाघाट मार्गे बंद असताना दुसरीकडे मात्र अवजड वाहतूक करणारे कंटेनर, चिरे वाळू सिलिका वाहतुक करणारे डंपर ट्रक आदी अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कतपणे फोंडाघाट मार्गातून होत आहे. याकडे जिल्हा प्रशासन डोळे उघडून कधी पाहणार आणि फोंडाघाटातून सुरू असलेली ही अवजड वाहन वाहतूक एखादी दुर्घटना घडण्याआधी रोखणार की नाही ? हा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

error: Content is protected !!