ग्रामसभेत गावात स्मार्ट मीटर न बसवण्याचा घेतला ठराव
महावितरण उप कार्यकारी अभियंता श्री. मेहेत्रे यांना सुनावले खडे बोल; ग्रामस्थ आक्रमक
चौके (प्रतिनिधी) : विजेचे वाढलेले युनिटचे दर व इंधनभार अतिरिक्त आकार यामुळे वीज ग्राहक त्रस्त असताना स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी महावितरण कडून चालू केलेल्या मोहिमेला चौके ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला आहे. याबाबत ग्रामसभेत स्मार्ट मीटर विरोधाचा ठराव घेण्यात आला आहे. या ठरावाची प्रत महावितरण कार्यालय मालवण येथे पाठवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मालवण महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री. मेहत्रे हे बुधवारी चौके ग्रामपंचायत स्मार्ट मीटर बाबत माहिती देण्यासाठी आले होते. यावेळी श्री. मेहेत्रे यांनी वीज ग्राहक ग्रामस्थांबरोबर चर्चा करताना ग्रामसभेने घेतलेल्या ठराबाबत आक्षेपार्य विधान केल्याबद्दल महावितरणचे अधिकाऱ्यांना उपस्थित ग्रामस्थांनी धारेवर धरून स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध दर्शवला. यावेळी श्री. मेहेत्रे यांनी माहिती सांगताना ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे असे सांगत विद्युत मीटर आमच्या महावितरण कंपनीच्या मालकीचे आहेत तेव्हा तुम्ही विरोध करू शकत नाही आणि ग्रामसभेचा ठराव घेऊ शकत नाही, असे विधान केले असता वीजग्राहक ग्रामस्थांनी यावर आक्षेप नोंदवला. स्मार्टमीटर बद्दल दादागिरी करून ग्रामस्थांना वेटीस धरण्याचे काम करत असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच चौके ग्रामदेवता श्री देवी भराडी मंदिर येथील पूर्वीचा मीटर कोणालाही कल्पना देता बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आला. त्याचे गेल्या दोन महिन्याचे बिल ज्यादा आल्याने त्याची कल्पना स्थानिक संबंधित अधिकारी यांना देण्यात आली होती मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न मिळाल्याने गावातील वीज ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटर बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गावातील वीज ग्राहक ग्रामस्थांनी चर्चेदरम्यान अनेक शंका उपस्थित केल्या. त्यावर समाधानकारक उत्तरे वीज वितरण अधिकारी यांना देता आली नाहीत. तसेच ग्रामपंचायत हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोडत असल्याने नळपाणी योजनेचा विद्युत आकार नळ धारकांच्या पैशातून परत असल्याने लावण्यात येणारे स्मार्ट मीटर ग्रामपंचायतीना लावण्यात येऊ नये, असे ठाम मत सरपंच यांनी व्यक्त केले.

यावेळी सुद्धा श्री. मेहेत्रे यांनी स्मार्ट मीटर न जोडल्यास सरपंचांवर कारवाई होऊ शकते असे सांगताच उपस्थित ग्रामस्थांनी काय ती कारवाई करा, संपूर्ण गाव सरपंचांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असे ठणकावून सांगितले.
या बैठकीला चौके ग्रामपंचायत सरपंच पी. के. चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, विशाखा चौकेकर, अक्षता गायकवाड, जयश्री कदम, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर, पोलीस पाटील रोहन चौकेकर, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, सेवानिवृत्ती शिक्षक सदाशिव गावडे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बिजेंद्र गावडे, संतोष गावडे चिरेखाण संघटना अध्यक्ष दत्ता गावडे, विष्णू चौकेकर, महेश सावंत, निरा सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.












