जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर… सत्ताधाऱ्यांचे अपयश – सुशांत नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचीच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना आजही गोवा-बांबुळी येथील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याला जिल्ह्याची गेले 30 वर्ष सत्ता भोगणारे राणे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप उबाठा सेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे. उंबर्डे-भूतेश्वरवाडी येथील सुंदरा शिवगण या मयत तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करून आल्यानंतर वैभववाडी येथील शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते.

यावेळी माजी सभापती लक्ष्मण रावराणे, माजी जि. प. सदस्य पल्लवी झीमाळ, चिटणीस गुलजार काझी, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाईक पुढे म्हणाले, वैभववाडी येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हे येतील लोकप्रतिनिधींचे काम आहे. या मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली दहा वर्षे आमदार म्हणून काम करत आहेत. त्यांचे वडील खासदार नारायण राणे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जवळपास 30 वर्ष राणे कुटुंबांकडे या जिल्ह्याची सत्ता आहे. त्यांनी स्वतःचं फाईव्ह स्टार हॉस्पिटल उभारले परंतु सरकारी हॉस्पिटल फाईव्ह स्टार करण्याची जबाबदारी का घेत नाहीत असा सवाल त्यांनी केला. तुम्हाला जनतेने भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे येत्या चार वर्षात आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे आव्हान आम्ही त्यांना देत आहोत. वैभववाडीत चांगले हॉस्पिटल उभे करा. जिल्ह्याची सत्ता तुमच्याकडे असताना आरोग्य यंत्रणा तुम्ही का सक्षम करू शकला नाही. त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. केवळ डॉक्टरांवर ठपका ठेवून चालणार नाही तर त्यांना आवश्यक औषधे, यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही तुमची आहे. येणाऱ्या डॉक्टरांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे प्रत्येक आरोग्य केंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक औषधे, आवश्यक यंत्रणा द्या म्हणजे योग्य उपचार होतील. फक्त लोकप्रतिनिधींनी बोंब मारणे हा त्यावरील उपाय नसून आरोग्य यंत्रणा सुधारणे हा त्यावरचा उपाय आहे असे नाईक यांनी सांगितले.

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात तज्ञ अनुभवी डॉक्टर मिळण्यासाठी आम्ही जिल्हाशल्यचिकित्सक श्रीपाद पाटील तसेच राज्याचे आरोग्य मंत्री आबीटकर यांच्याशी, माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून संपर्क साधून मागणी करणार आहोत, असे नाईक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

error: Content is protected !!