वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने भात खरेदीत (राज्य शासन खरेदी विभाग) मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पणन महासंघ मार्फत संघाचा सत्कार करण्यात आला. संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी मुंबई येथे हा सत्कार स्वीकारला. गेली पाच-सहा वर्ष वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करीत आहे. सन 2024 – 25 या आर्थिक वर्षात संघाने तालुक्यातील 303 शेतकऱ्यांकडून 3 हजार 228 क्विंटल भात खरेदी केले असून यातून तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना 75 लाख 62 हजार रुपये हमी भाव तर बोनस म्हणून 56 लाख असे सुमारे 1 कोटी 31 लाख रुपये शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर खत, कीटक नाशक, पशुपक्षी खाद्य माफक दारात विक्री केली जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती व शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी संघाकडून प्रोत्साहन दिले जाते. शेती व शेती पूरक व्यवसायात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाचा संघा कडून दरवर्षी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. संघाच्या या एकूणच कामांची दाखल घेऊन या वर्षी संघाचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या एकूण 10 हजार 806 सहकारी संस्थांतून राज्यातून धान खरेदी,खत खरेदी विक्री व सर्वच पातळीवर अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या वैभवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा पणन महासंघाकडून सन्मान करण्यात आला. संघांचे चेअरमन प्रमोद रावराणे, व्हा. चेअरमन अंबाजी हुंबे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.











