आपण शरीराने जरी दिव्यांग असलो तरी मनाने नाही – अनिल शिंगाडे

खारेपाटण येथे दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजात नैसर्गिक व अपघाताने अपंगत्व आलेले बांधव हे समाजाचा एक घटक असून शरीराने जरी हे बांधव दिव्यांग असले तरी मनाने अजिबात नाही, असे भावपूर्ण उद्गार सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी खारेपाटण येथे महात्मा गांधी सेवा संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षणसंस्था कसाल आणि खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग बांधवांच्या विकास विभागीय मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या दिव्यांग बांधवांच्या विभागीय मेळाव्याच्या चिंचवली गावचे सरपंच अशोक पाटील, शिडवणे गावचे सरपंच रवींद्र शेट्ये, वायंगणी गावचे सरपंच प्रताप पवार, वारगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्या क्षितिजा धुमाळे, मनाली होणाळे, दक्षता सुतार, अमिषा गुरव, जयदीप देसाई, किरण कर्ले, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, खारेपाटण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम, खारेपाटण ग्रा.पं. ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, खारेपाटण एकता दिव्यांग बांधव संघटनेचे अध्यक्ष राजा गुरव, कार्यकर्ते दीपक बोभाटे, सुनील सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यमाचे उद्घघाटन दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर महात्मा गांधी सेवा संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षणसंस्था कसाल यांच्या वतीने खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांचा मेळाव्याचे उत्तम नियोजनाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

खारेपाटण मधील एकही दिव्यांग बांधव शासकीय सवलतीपासूम वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी सांगितले. यावेळी विजय देसाई, संतोष पाटणकर, रवींद्र शेट्ये यांनी देखील मनोगत व्यक्त करत अपंग बांधवांच्या मेळाव्याला शुभेछा दिल्या. यावेळी खारेपाटण पंचक्रोशीतील सुमारे ५० पेक्षा अधिक दिव्यांग बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दिव्यांग संस्थेच्या सचिव श्रीमती कासले यांनी संस्थेचा अहवाल वाचन करून दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती मेळाव्याला उपस्थित बांधवांना दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल शिंगाडे यांनी केले.

error: Content is protected !!