विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकरांचे कौतुकोद्गार
सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क व सुविधा केंद्राची दखल खुद्द विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यांच्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले असून अशा प्रकारचा “पॅटर्न” सर्व आमदारांनी आपापल्या जिल्ह्यात राबवावा, अशा सूचना त्यांनी आपल्या सहकारी आमदारांना केल्या आहेत. दरम्यान या कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना मोफत टाकले तसेच रुग्णवाहिका व मदत उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला. श्री. परब यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दरम्यान आज विशाल परब यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करत आपण कार्यालय उभारण्या मागचे आपले व्हिजन त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातून आणि तळागावातून येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून चांगली सेवा उपलब्ध व्हावी. रुग्णवाहिका सेवा तसेच उभारण्यात आलेल्या सेवा केंद्रात सर्व प्रकारचे दाखले मोफत देण्यात येणार आहेत. त्याचा फायदा तळागाळातील लोकांना होणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या लोकांना सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सेवा केंद्रात दोन आणि जनसंपर्क कार्यालयात दोन असे चार कर्मचारी कायम ठेवणार आहे तसेच याच ठिकाणी आपण मतदार संघातील कार्यकर्त्यांशी भेटणार आहोत. याबाबत लवकरच आपण आठवड्यातील दिवस ठरवून माहिती देऊ, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यक्रम कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांना सेवा मिळावी आणि त्याचा फायदा गोरगरिबांना व्हावा, असा मानस व्यक्त केला तसेच येणाऱ्या काळात आपण यापेक्षाही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू लोकांसाठी सामाजिक काम करायचे आहे. त्यामुळे आपले सामाजिक काम नियमित चालू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर उपस्थित होते.












