मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळुन दिपोत्सव साजरा करण्यात आला
आचरा (प्रतिनिधी) : संस्थान आचरे गावच्या कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवाची सांगता बुधवारी रात्री दीपोत्सवाने झाली.गेला महिनाभर सुरू असलेल्या रात्रौ होणा-या पालखी सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी रात्री दिपोत्सवाने तर विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या काकडा आरती ची सांगता सकाळी दहिहंडी फोडून करण्यात आली. या साठी भाविकांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती.
आचरे गावचा महिनाभर चालणारा उत्सव म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला कोजागिरी पौर्णिमेपासून सुरूवात झाली होती. यात रोज रात्री पालखीची रामेश्वर मंदिरास सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटेला रामेश्वर मंदिराला लागूनच असलेल्या विठ्ठल मंदिरात काकडा आरती महिनाभर चालू होती.या उत्सवात कार्तिक दशमीला आचरा वरची वाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशी ला देऊळवाडी येथील विठ्ठल मंदिराला पालखीच्या भेटीचा सोहळा, कार्तिक महिन्यात दर सोमवारी, दशमी, एकादशीला श्री देव रवळनाथ मंदिर भेटीचा सोहळा पारणे फेडणारा ठरला.
त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी श्री देव रामेश्वर मंदिरात श्री ची मूर्ती पंचमुखी महादेव स्वरूपात सजले होते. वर्षातून काही ठराविकच वेळी दर्शनाचा लाभ होणा-या या पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. रात्रौ मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळुन तसेच फुलांच्या पाकळ्या च्या विविध प्रकारच्या रांगोळ्या काडून दिपोत्सव साजरा करण्यात आला. पालखी प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली. तर पहाटे विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या काकडा आरती ची सांगता दहिकाल्याने झाली. या सोहळ्याला भाविकांची गर्दी उसळली होती. श्री देव रामेश्वर यांच्या वतीने प्रत्येक भविकास श्रीफळ व चुरमुरे प्रसाद म्हणून देण्यात आला.












