“वंदे मातरम्” मातृभूमीवरील प्रेमाचे प्रतीक – प्रा. डॉ. बालाजी सुरवसे
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट येथे “वंदे मातरम्”च्या १५० वर्षानिमित्त ‘भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी केले. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून फोंडाघाट महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “वंदे मातरम्” हे गीत फक्त म्हणणे नव्हे तर त्यामागील अर्थ समजून घेणे आणि त्या भावनेनुसार वागणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देणे म्हणजेच या गीताची खरी स्तुती होय. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी हे गीत लिहून इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांना प्रेरणा दिली आणि देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. सुरवसे पुढे म्हणाले, “काही लोकांनी राजकीय किंवा धार्मिक फायद्यासाठी या गीताचा गैरवापर केला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ‘वंदे मातरम्’ हे गीत कोणत्याही संघटनेचे नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणातील मातृभूमीवरील प्रेमाचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. “वंदे मातरम् हे गीत केवळ एक राष्ट्रगीत नाही, तर ते आपल्या संस्कृतीचे आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. आजच्या पिढीने या गीताचा खरा अर्थ समजून घेत देशासाठी कार्य केले पाहिजे. भारतमातेचा गौरव राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक तरुणाने आपल्या कार्यातून, कर्तृत्वातून, प्रामाणिकपणातून देशाच्या उभारणीत वाटा उचलला पाहिजे. मातृभूमीप्रती निष्ठा, प्रामाणिकता आणि सेवा या मूल्यांवरच खऱ्या अर्थाने ‘वंदे मातरम्’चा आत्मा जिवंत राहतो.
या प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हुंडा हायस्कूलचे विद्यार्थीनी पूजा हुंबे येणे वकृत्व स्पर्धेतील बक्षीस मिळविले. तसेच कणकवली रणखांब कला मंचचे श्रीधर पाचंगे आणि सहकाऱ्यांनी “वंदे मातरम्” या गीतावर आधारित प्रभावी नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे प्राचार्य प्रसाद पारकर, राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य संते, फोंडा मंडल अधिकारी प्रवीण मोंढे, तलाठी समृद्धी गवस, पत्रकार संजय सावंत व तुषार नेवरेकर, जलसंधारण अधिकारी अब्दुल्ला पिरजादे, सहाय्यक गटशिक्षणाधिकारी मंगेश वालावलकर, रामचंद्र नारकर, संतोष भोवड, दीपक ईस्वलकर, रवींद्र रावराणे, अश्विनी पेडणेकर, अजय साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जोईल यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अभिषेक जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शार्दुल, शिक्षक आसोलकर, राहुल पाटील, मयुरेश पराडकर, शिक्षक शिरोडकर, भास्कर पाटील, स्वप्निल विश्वंभरे, सतीश मिस्त्री, गणेश मराठे, सायली तळवडेकर, अभिषेक जोशी, सतीश चिंदरकर व ईस्वलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.













