आफताब शेख आत्महत्येच्या निष्पक्ष चौकशीची मागणी; द्वेष पसरविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक सलोखा राहावा, प्रत्येक नागरिकांना संविधानाने दिलेल्या हक्का नुसार निर्भयपणे व्यवसाय करता यावा यासाठी समाजात अशांतता पसरविणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. जिल्ह्यात सर्व धर्मीय एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना अल्पसंख्यांक बांधवांना धमकावण्याचे व त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा व्यक्तींना आळा घालावा या मागणीसाठी आज आम्ही भारतीय च्या वतीने सर्व धर्मीय बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
सिंधुदुर्ग जिल्हा तसेच संपूर्ण राज्यात अल्पसंख्यांक समुदाय यांचेवर होणारे हल्ले तसेच अल्पसंख्यांक समुदायाकडून खरेदी विक्री करू नये अशा स्वरूपाच्या पोस्ट समाजमाध्यमांवर पसरविल्या जात आहेत. अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात विव्देषपुर्ण विधाने, पोस्ट व व्हिडीओ प्रसारीत करून त्यांच्या विरोधात जाणीवपुर्वक विनाकारण द्वेष निर्माण करण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत. त्या सर्व घटनांमुळे या जिल्हयातील व राज्यातील अल्पसंख्य समुदाय तसेच संविधान प्रेमी नागरीक व्यथीत झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हयातील बांदा व दोडामार्ग येथील घटना पाहता अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तींच्या विरोधात विनाकारण विव्देष निर्माण करण्याचा व संविधानाने दिलेला आपल्या मर्जीचा व्यवसाय करण्याचा संविधानिक अधिकार झुंडशाहीच्या जोरावर बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून निर्माण झालेल्या आर्थीक कोंडीमुळे बांदा येथील फुल विक्रेता आफताब शेख याने आत्महत्या केली. सदरचे प्रकरण मागील चार ते सहा महिने पोलीस व प्रशासनासमोर संबंधीत कुटुंब मांडत होते. परंतु पोलीस व प्रशासनाने या प्रकरणात सन्माननीय तोडगा काढण्यासाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आफताब शेख सारख्या व्यक्तीस आत्महत्या करावी लागली.
दोडामार्ग येथील प्रकरणात पोलीस गुन्हेगारांच्या विरूध्द कायदेशीर कारवाई करून गुन्हयाचा तपास करीत असताना या प्रकरणात राजकीय नेते व संघटना आरोपीच्या समर्थनार्थ चिथावणीखोर भाषणे करून जिल्हातील सलोखा व बंधुता नष्ट करीत असताना आढळतात. वरील प्रकरणामध्ये उघड व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांच्या विरूध्द पोलीस यंत्रणा कोणतिही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सदरच्या व्यक्ती व संघटना अधिक आक्रमक होवून अल्पसंख्य समुदायाला दहशतीत ठेवण्याच्या उददेशाने सार्वजनिक ठिकाणी पोलीसांच्या उपस्थितीत प्राणघातक हत्यारे घेवून मिरवणुका काढतात.
आफताब शेख प्रकरणामध्ये पोलीसांनी हेतुपुरस्सर संबंधीत आरोपींच्या विरूध्द फिर्याद नोंदविण्यासाठी विलंब केला आहे. तसेच संबंधीत आरोपींना अटकपुर्व जामीन मिळेल अशी स्थिती निर्माण केलेली आहे. यामुळे या गुन्हयाचा योग्य तपास सिंधुदुर्ग पोलीसांकडून होईल असा विश्वास आफताब शेख कुटुंबियांना वाटत नाही.
यामुळे आफताब शेख प्रकरणी स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टिम गठीत करून या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून गुन्हेगारास शासन होईल यासाठी सर्व ते आदेश शासनाने दयावेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील व राज्यातील धार्मिक व जातीय सलोखा व बंधुभाव नष्ट करण्याच्या हेतूने जाहीर वक्तव्य, सोशल मिडीयावर पोस्ट व व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्या व्यक्ती व संघटना यांचेवर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आपल्या जिल्हयात साटेली-भेडशी, सावंतवाडी व बांदा येथे अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तींना त्यांचा व्यवसाय करण्यापासून अटकाव केला जातो. त्यांच्या विरोधात संविधान विरोधी ठराव स्थानीक स्वराज्य संस्थांमधून केले जातात. अशा ठिकाणी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी याची त्वरीत दखल घेवून संबंधीत व्यक्तींना व्यवसाय करण्यास अटकाव करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कारवाई करावी तसेच संबंधीत व्यावसायिकांना त्यांचा निर्भयपणे व्यवसाय करता येईल अशी व्यवस्था निर्माण करावी. समाजात शांतता व सदभाव रहावा यासाठी ज्या गावात, शहरात अल्पसंख्यांक समाजाची वस्ती आहे, तेथे मोहल्ला कमिटीची नव्याने स्थापना करावी. मोहल्ला कमिटीमध्ये पोलीस प्रशासनाची व्यक्ती व सर्व धर्मातील शांतताप्रेमी व्यक्ती (त्यांचा पुर्व इतिहास विचारात घेवून) यांची सभासद म्हणून नियुक्ती करण्यात यावी. मोहल्ला कमिटीची बैठक किमान महीन्यातून एकदा घेण्यात यावी व त्या बैठकीत त्या गावातील, शहरातील सलोखा, शांतता, बंधुभाव टिकविण्याच्या हेतूने सर्व धर्मिय लोकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावेत. तसेच समाज माध्यमांवर विव्देष पसरविणाऱ्या पोस्ट संबंधीत यंत्रणांना निर्देश देवून त्या पोस्ट समाज माध्यमांमधून डिलीट करण्याची प्रक्रीया तातडीने पोलीस प्रशासनाने करावी. अल्पसंख्यांक समुदायाकडून वस्तुंची खरेदी विक्री करू नये तसेच त्यांच्यावर व्यवसाय बंदी करावी व आर्थिक बहीष्कार करावा अशा स्वरूपाची वक्तव्य व आवाहन करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. धार्मिक व जातीय ताणतणावाच्या प्रकरणात कारवाई करताना पोलीस प्रशासन भेदभाव व पुर्वग्रह दुषीत पध्दतीने कारवाई करताना दिसते. अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात विव्देष पसरविणाऱ्या व्यक्ती व संघटनांच्या विरूध्द पोलीस यंत्रणा प्रतिबंधात्मक कारवाई करीत नाही व त्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये देखील पोलीस बोटचेपी वर्तन करतात. त्यामुळे या देशातील सर्व नागरीक समान असल्याने गुन्हेगार अथवा समाज कंटकाचा जात धर्म न पाहता त्याने केलेल्या गुन्हयाच्या स्वरूपानुसार कायदयात अभिप्रेत असलेली कठोर कारवाई करावी. सिंधुदुर्ग जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था धार्मिक व जातीय सलोखा व बंधुभाव कायम रहावा यासाठी आम्ही भारताचे नागरीक पोलीस व प्रशासनास सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहोत. तरी याप्रकरणी शासनाने गंभीर दखल घेवून सर्व संबंधीतांना योग्य ते निर्देश व आदेश दयावेत व जिल्हयातील अल्पसंख्यांक समुदायास निर्भयपणे आपले व्यवसाय व दैनंदीन जीवन जगण्याचा संविधानिक अधिकार बजावण्यासाठी सर्व ते सहकार्य करावे या मागणीसाठी आज जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने मोर्चा काढला व आपल्या भावना निवेदनाव्दारे मांडल्या आहेत.
या वेळी माजी आमदार वैभव नाईक, कमलताई परूळेकर, ऍड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, मुस्ताक शेख, सरफराज नाईक, इजाज नाईक, रफिक मेमन यांच्यासह सर्व धर्मीय बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.











