खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन एसटी विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत आज बुधवार दि.१२ नोव्हेंबर, २०२५ रोजी खारेपाटण एसटी बस स्थानकाची एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत शासनाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीचे पदाधिकारी तथा रा.प.विभाग सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, प्रवीण पाटील (रा. प.कामगार अधिकारी विभाग सांगली), सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, प्रवासी मित्र सागर कल्याणकर यांनी खारेपाटण एसटी बस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण बसस्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवली एसटी बस स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, वाहतूक नियंत्रक यशवंत पावसकर, कणकवली एसटी डेपो सहायक कार्यशाळा अधिकारी अनिश रेडीज, खारेपाटण एसटी बस स्थानक वाहतूक नियंत्रण प्रमुख प्रवीण कर्पे, माजी सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक प्रमुख चंद्रकांत कांबळे, खारेपाटण बस स्थानक सफाई कामगार सुवर्णा रमेश पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण एसटी बस स्थानक हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यांना जोडणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख एसटी बसस्थानक असून येथील परिसर स्वच्छ व सुंदर असून कर्मचारी वर्ग चांगली बस स्थानक सुंदर ठेवण्यासाठी चांगली मेहनत घेत आहेत. यांबद्दल स्वच्छ सुंदर बसस्थानक मूल्यांकन समिती सदस्य तथा सांगली जिल्हा रा.प. विभाग नियंत्रक प्रमुख सुनील भोकरे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कणकवली स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख श्रीनिवास कदम व खारेपाटण एसटी बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख कणकवली एसटी डेपो सहायक कार्यशाळा अधिकारी अनिश रेडीज, खारेपाटण एसटी बस स्थानक वाहतूक नियंत्रण प्रमुख प्रवीण कर्पे यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक मूल्यांकन समितीचे खारेपाटण एसटी बसस्थानकात स्वागत केले.












