खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराटवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच शाळेतील सभागृहात गावचे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कुरंगवणे खैराट जि.प. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू नारायण गोठणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संजय कोकाटे, उपसरपंच बाबला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर, पोलिस पाटील देवेन गोसावी, कुरंगवणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष महावीर गोसावी, पांडुरंग गोठणकर, सदाशिव कुडाळकर, संतोष मांडवकर, दीपक पाष्ठे, विश्वनाथ गोसावी, दीपक भितम, मुंबई येथील रहिवासी असलेले शाळेचे माजी विद्यार्थी नारायण कुडाळकर, नारायण रामाने, चेतन भितम, स्वप्नील मांडवकर, मारुती पाष्टये, अंगणवाडी सेविका आशा लडगे तसेच गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या गावातील शाळा स्वच्छ सुंदर आणि भौतिक सोयी सुविधानयुक्त असायला हवी तर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना पुढे येऊन त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण फेडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे भावपूर्ण उद्गार कुरंगवणे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांनी शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद बागडी यांनी केले. तर आभार शाळेच्या उपशिक्षिका शारदा तांदळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक गोविंद बावदाणे, उपशिक्षक राजू गर्जे यांनी सहकार्य केले.












