दोडामार्ग (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थांबलेले गणेश टस्कर आणि त्याची सहकारी मादी हत्ती आता दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे–घाटीवडे परिसरात दाखल झाले आहेत. आज सकाळी हे दोन्ही हत्ती फिरत असताना स्थानिक शेतकरी दत्ताराम देसाई यांच्या नजरेस पडले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी तत्काळ त्या ठिकाणावरून दूर पळ काढला. मात्र, हत्तींची छबी मोबाईलमध्ये टिपण्यास त्यांना यश आले आहे.
महिनाभरापूर्वी हे हत्ती परत गेल्यानंतर शेतीची कामे सुरळीत पार पाडू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला होता. परंतु आता पुन्हा हत्तींची एंट्री झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मोर्ले येथे एका शेतकऱ्याचा बळी घेणारा ‘ओंकार’ हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात आणि गोव्यालगतच्या भागात धुमाकूळ घालत आहे. तिलारी खोऱ्यातील मूळ कळपातून तो स्वतंत्र झाला आहे. हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, या हत्तींना तातडीने हाकलून लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. वनविभागाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.











