मांगवली आयरेवाडीत तरुणावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : मांगवली आयरेवाडी येथील विवाहित तरुणावर बिबट्याने जीव घेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विजय अशोक आयरे वय 27 वर्षे असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयरेवाडी पुलानजीक घडली. त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथे उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या मानवी हल्ल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

मांगवली आयरेवाडी येथील विजय आयरे यांचे कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. त्यांची गुरे बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत घरी आली नव्हती. त्या गुरांना शोधण्यासाठी विजय आयरे व त्याचा पुतण्या गंधार आयरे हे दोघे मोटारसायकल घेऊन वेंगसरच्या दिशेने जात होते. दरम्यान विजय हे आयरेवाडी येथील पुला नजीक लघुशंकेसाठी थांबले. जवळच असलेल्या नदीपात्रात ते उतरले. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून जोरदार हल्ला केला. बिबट्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी बिबट्याशी झटापट केली. यात त्यांच्या डोक्याला, डाव्या पायावर व चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. विजय व त्याच्या पुतण्याने केलेल्या आरडाओरडामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. यांचा पुतण्या गंधार यांनी जखमी अवस्थेत विजय यांना प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत येथील डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. विजय यांची प्रकृती आता ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या डोक्यावर जखम असल्यामुळे त्यांना सिटीस्कॅन करून घेण्याचे सांगितले आहे असे त्यांनी सांगितले.

वैभववाडी तालुक्यासह मांगवली व मांगवली पुनर्वसन गावठाण यादरम्यान गेले काही महिने बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून त्याच्याकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. मांगवली पुनर्वसन येथे तर अनेक वेळा बिबट्या वस्तीत फिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून वन विभागाकडे करण्यात येत आहे. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

बिबट्याकडून वारंवार शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात आहे. याबाबत वनविभागाला माहिती पुणे वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता तर या बिबट्याने माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मांगवली सरपंच शिवाजी नाटेकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!