हुंबरट प्रभागस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन
कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत कला, क्रीडा गुणांचा अधिक विकास व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा बाल कला क्रीडा महोत्सवातून उद्याचे उत्तम खेळाडू आणि प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास बिडवाडी सरपंच पूजा चव्हाण यांनी व्यक्त केला.
हुंबरट प्रभागस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. माध्यमिक विद्यालय बिडवाडीच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत बिडवाडी सरपंच पूजा चव्हाण यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. तर उपसरपंच सुदाम तेली यांचे हस्ते क्रीडांगणावरील सांघिक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना उपसरपंच श्री.तेली म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिकाटी, मेहनत आणि प्रचंड जिद्द बाळगावी. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक आणि पालक यांनी अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन केले.
यावेळी वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, पिसेकामते सरपंच प्राजक्ता मुद्राळे, स्थानिक समिती अध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर, बिडवाडी माजी उपसरपंच आनंदराव साटम, बिडवाडी हायस्कूल मुख्याध्यापक आनंदा कांबळे यांनी स्पर्धक विद्यार्थांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. यावेळी विचारमंचावर सामाजिक कार्यकर्ते रमेश आचरेकर, बिडवाडी पोलीस पाटील नामदेव राणे, डाॅ.चराटे, बिडवाडी हायस्कूल माजी मुख्याध्यापक सुमुख जोशी, शालेय समिती सदस्य पांडुरंग मगर, अभिमन्यू लाड, सिद्धी गुरव, स्मिता घाडी, संजिवनी बागवे, विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, केंद्रप्रमुख शिवाजी पवार, शांताराम सावंत, नारायण ओटवकर, क्रीडाप्रमुख गिल्बर्ट फर्नांडिस, उपक्रीडाप्रमुख अजय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

वरवडे फणसवाडी प्रशालेने ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. हुंबरट प्रभागाच्या वरिष्ठ विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि क्रीडा समारंभाचे प्रास्ताविक केले. बाल कला क्रीडा महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून श्रिया फोंडके यांनी सर्व विद्यार्थी स्पर्धकांना क्रीडा प्रतिज्ञा दिली. बाल महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लहान गट आणि मोठ्या गटाच्या सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारातील स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह अचित कदम आणि मित्रपरिवार यांनी पुरस्कृत केली आहेत. हुंबरट प्रभागाच्या वतीने त्यांचेही आभार मानण्यात आले.
यावेळी हुंबरट प्रभागांतर्गत बिडवाडी, सावडाव, नांदगाव आणि जानवली केंद्रातील सर्व शाळांतील विद्यार्थी, व्यवस्थापक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि पालकवर्ग उपस्थित होते. सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील नियोजित पंचप्रमुख आणि सहकारी पंच यांनी उत्तमरित्या काम पाहिले. उद्घाटन सोहळा आणि संपूर्ण दिवसाचे सूत्रसंचालन श्रीकांत बुचडे आणि राजेश कदम यांनी केले. तर बाल कला क्रीडा महोत्सवाला अर्थपूर्ण सहयोग आणि सहकार्य केलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचे आणि संयोजन समितीचे आभार क्रीडाप्रमुख गिल्बर्ट फर्नांडिस यांनी मानले.










