मंत्री नितेश राणेंची माहिती; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
या समितीत महसूल मंत्री, वन मंत्री तसेच बंदरे मंत्री यांचा सह-अध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला असून, मंत्री नितेश राणे हे स्वतःही या समितीचे सदस्य असतील. गडकिल्ल्यांवर काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व थडगी उभारून ऐतिहासिक ठसा पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. काही अतिक्रमित ठिकाणी संशयास्पद वस्तू आणि हत्यारे आढळून आल्याची माहितीही त्यांनी दिली, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडकिल्ल्यांचे मूळ ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी सरकार आता ठोस आणि प्रभावी कारवाई करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी या विशेष समितीच्या माध्यमातून समन्वयाने आणि युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.










