सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : भाडोत्री महिला राहत असलेले घर पाडून पीडित महिलेच्या हाताला धरून तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी संजय शरद गांगनाईक (मूळ रा. भरड, ता. मालवण, सध्या रा.मुंबई) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. पीडित महिलेच्या वतीने ॲड. स्वरूप पई, ॲड. यतीश खानोलकर यांनी युक्तिवाद केला. पीडित महिलेने मालवण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पीडित महिला भाड्याने राहत असलेले घर आरोपी संजय गांगनाईक व अन्य दोन आरोपीनी जेसीबीने जमीनदोस्त केले. पीडित महिलेला शिवीगाळ करून तिच्या हाताला धरून तिचा विनयभंग केला. ही घटना 27 डिसेंबर 2025 रोजी घडली होती. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी संजय गांगनाईक व अन्य दोन आरोपींविरोधात 30 डिसेंबर 2025 रोजी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी संजय शरद गांगनाईक याला पोलिसांनी भा. ना. सु. स. कलम 35 (3) नुसार नोटीस दिली होती. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आरोपी शरद याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. गुन्हा तपासकामी आरोपी शरद गांगनाईक याने पोलिसांना तपासकामी सहकार्य केले नाही. आरोपी शरद हा गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून अन्य दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा त्याला माहित आहे. घर पाडण्यासाठी वापरलेला जेसीबी व ड्रायव्हर बाबत तपास करायचा आहे. अन्य दोन आरोपिंशी शरद याने कसा संपर्क केला याचा तपास करणे, आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तो तपासकामी सहकार्य करणार नाही, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायालयाने आरोपी संजय गांगनाईक याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.












