तळेरे (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या आणि ‘इन्स्टंट’ मेसेजिंगच्या जगात पत्रांमधील मायेचा ओलावा कुठेतरी हरवत चालला आहे. मात्र, हीच पत्रसंस्कृती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली ती कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात. भारतीय डाक विभागाच्या ‘ढाई आक्षर’ राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेच्या निमित्ताने येथील १२० विद्यार्थ्यांनी ‘स्मार्टफोन’ बाजूला सारून हातात लेखणी धरली आणि पोस्ट कार्डावर शब्दांचे संचित मांडले.
यावर्षी स्पर्धेचा विषय “एक पत्र माझ्या आदर्श व्यक्तीला ” असा होता. कोणी आपल्या आई-वडिलांना, कोणी शिक्षकांना, तर कोणी थोर क्रांतिकारकांना उद्देशून पत्रे लिहिली. पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्राचे स्वरूप काय असते, हे काही विद्यार्थींनी या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच जवळून अनुभवले. मोजक्या शब्दांत पण मनाला भिडणाऱ्या आशयामुळे विद्यार्थ्यांचे हे पत्रलेखन उपस्थितांची दाद मिळवून गेले.
केवळ स्पर्धाच नाही, तर डाक विभागाच्या कार्याची माहिती ही विद्यार्थ्यांना देण्यात आली. देवगड उपविभागाचे कर्मचारी रोहन सावंत आणि डाक आवेक्षक विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना डाक विभागाच्या नवीन बदलां विषयी माहिती दिली. पत्र कसे पोस्ट करावे, पिनकोडचे महत्त्व काय आणि डाक विभागाच्या विविध योजना कशा चालतात, याचे प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना घडले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.भाग्यश्री बिसुरे,पर्यवेक्षक श्यामसुंदर राणे,सहाय्यक शिक्षिका संजीवनी नागावकर यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. “तंत्रज्ञानाच्या वेगात पत्र लेखनाची कला मागे पडू नये, यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत,” असे मत यावेळी प्राचार्यांनी व्यक्त केले.












