वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे धक्कादायक घटना घडली असून, मुलानेच आपल्या जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना काल रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर पाल मडकीलवाडी (ता. वेंगुर्ला) येथे घडली. याप्रकरणी मध्यरात्री वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सौ. जागृती जयेश सरमळकर (मूळ रा. अणसुर मडकीलवाडी, सध्या रा. विनायक रेसिडेन्सी, कॅम्प वेंगुर्ला) यांनी दिली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी उमेश वासुदेव सरमळकर (रा. अणसुर मडकीलवाडी, ता. वेंगुर्ला) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. या कर्जावरून आई-वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना, उमेश सरमळकर याने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने अंगणात बसलेल्या आईवर गोळी झाडली. गोळी त्यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या जागीच गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












