“संविधानाच्या आकांक्षा पूर्ण करणारे साहित्य अधिक मूल्यवान” – प्रा. डॉ. सुभाष वाघमारे
खारेपाटण (प्रतिनिधी) : “माणसाला गाफील न ठेवता माणसाला सजग करणारे साहित्य, डोळस बनवणारे साहित्य आज आवश्यक आहे, याचे भान लेखकास असायला हवे. न्यायाचे प्रश्न उभे करणारे आणि सर्व माणसांच्या कल्याणाचा विचार करणारे, संविधानाच्या आकांक्षा पूर्ण करणारे साहित्य अधिक मूल्यवान असते. “असे परखड विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी नवोदित लेखक प्रकाश सकपाळ यांच्या पहिल्या वहिल्या “कुडपाण” या पुस्तक कथासंग्रहाच्या प्रकाश सोहळ्यात व्यक्त केले. डॉ. मारुती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर तालुक्यातील कोंड्ये या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक सांस्कृतिक मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने जनता विद्यालय कोंडये येत आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला स्पर्श प्रकाशनचे प्रकाशक जेष्ठ साहित्यिक मदन हजेरी,’ फक्कड’ कादंबरीचे लेखक सचिन अवघडे, ‘हेलपाटा’ कादंबरीचे लेखक तानाजी धरणे, डॉ. संदीप कांबळे, डॉ. राजेंद्र बावळे, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, आबासाहेब मराठे कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय मेस्त्री, कोंडये गावच्या सरपंच मीनल तळवडेकर, उपसरपंच महेश कारेकर, पोलिस पाटील मानसी कोंडकर, राजू शिवगण, अनिल कोंडकर, श्रीकृष्ण बावीलकर, सुधीर सकपाळ, कुंडलिक गवळी, मानसी कोंडकर, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘कुडपाण‘ कथासंग्रहाची वैशिष्ट्ये सांगताना ते पुढे म्हणाले की कुडपानला प्रामाणिकपणाचा गंध आहे.
विस्मृतीत गेलेल्या नीतिमान माणसांच्या जीवनकथा लेखकाने सहृदयतेने उलगडल्या आहेत. विश्राम काजूचा पराक्रम, गावकुसाबाहेरील संघर्ष, इज्जत- स्वाभिमान आणि समूहभावना नैतिक मूल्ये प्रभावीपणे साकार झाली आहेत. गाव,वाटा,झाडे,डोंगर आणि दृष्टीआड गेलेल्या व्यक्तिरेखा जिवंत होत कोकणचा निसर्ग डोळ्यांसमोर उभा राहतो. ग्रामीण बोली,रसदार शैली आणि वेधक वर्णन यांमुळे कथा थेट जीवनाच्या वास्तवाशी जोडल्या जातात. तर सामाजिक भान, मानवी मूल्ये आणि संवेदनशील भाषा यांमुळे ‘कुडपाण’ वाचकाला विचार करायला लावणारा उठावदार कथासंग्रह ठरतो.असे त्यांनी यावेळी सांगितले.
“अण्णाभाऊ साठे,बाबुराव बागुल.शंकरराव खरात,चंद्रकुमार नलगे ,यांच्यासारखी हृदय हेलावून विचार करायला लावणारी भाषा प्रकाश सकपाळ यांनी आत्मसात केली आहे तर प्रकाशक मदन हजेरी यांनी राजापूर तालुक्यात प्रथमच असा भव्य समारंभ होत असल्याचे सांगत प्रकाश सकपाळ यांचे लेखन व मुखपृष्ठ तयार करणाऱ्या सायली कोंडाकर हिचे चित्र कौशल्य ताकदीचे असल्याचे सांगितले.” अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. मारुती कांबळे यांनी सांगितले की, ‘कुडपाण’ हा कथासंग्रह केवळ साहित्यिक निर्मिती नसून तो ग्रामीण समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक जाणिवांचा दस्तऐवज आहे. लेखकाने आपल्या अनुभवांवर आधारित वास्तववादी लेखन केले असून हे साहित्य भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.” लेखक प्रकाश सखाराम सकपाळ यांनी आपल्या लेखन प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, ‘कुडपाण’ हा कथासंग्रह म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अनुभव, त्यांनी पाहिलेले संघर्ष आणि कोकणातील माणसांचे वास्तव जीवन यांचा साहित्यमय आविष्कार आहे. या कथांमधून समाजातील दुर्लक्षित घटकांचे दुःख व स्वप्ने वाचकांपर्यंत पोहोचावीत, हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सचिन अवघडे व तानाजी धरणे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सायली कोन्डकर हिचा कौतुकासह विशेष सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक व सांस्कृतिक मंडळ रत्नागिरी यांनी सुग्रीव मुंडे या शिक्षकास गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. लेखक प्रकाश सकपाळ व त्यांच्या पत्नी सौ प्रणाली यांचा सन्मान मंडळाच्या वतीने प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे हस्ते करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. या प्रकाशन सोहळ्याला राजापूर तालुक्यासह कोकण परिसरातील लेखक, कवी, समीक्षक, शिक्षक, विद्यार्थी व साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












