कासार्डे कॉलेजच्या प्रा.प्रियांका सुतार यांची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर विभागीय स्पर्धेत मिळविला तृतीय क्रमांक

कासार्डे (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कोल्हापूर विभागातून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डेच्या गणित विषयाच्या प्राध्यापिका प्रियांका यशवंत सुतार तृतीय आल्या असून त्यांची निवड नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रा.प्रियांका सुतार या राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व SCF पार्श्वभूमीवर शिक्षकांना आरोग्याबरोबरच ताण तणावाचे समायोजन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे, यासाठी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच योगाचा सराव करण्यासाठी शिक्षकांमधून उत्तम व तज्ञ प्रशिक्षक तयार होण्याच्या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी कोल्हापूर विभागीय स्तरावर योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुका, विभाग व राज्य असे या स्पर्धेचे तीनस्तर आहेत. प्रियांका यशवंत सुतार यांना योगासन स्पर्धेत कणकवली तालुक्यातील प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले व त्यांची निवड कोल्हापूर येथे विभागीय स्पर्धेसाठी झाली होती. सदर विभागीय स्पर्धा कोल्हापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा सांगली व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांक आलेल्या शिक्षकांचा समावेश होता. या ठिकाणीही त्यांनी उत्तम योग सादर करून तृतीय येण्याचा मान पटकावला.

प्रियांका सुतार यांच्या यशाबद्दल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, अधिव्याख्याता संदीप पवार, गटशिक्षण अधिकारी किशोर गवस, केंद्रप्रमुख संजय पवार, तज्ञ मार्गदर्शक सचिन तांबे, कासार्डे विकास मंडळ, मुंबई संस्थेचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, पालक संघ पदाधिकारी, मुख्याध्यापक भाग्यश्री बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. योगा मार्गदर्शक प्रियंका सुतार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!