खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथे स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणतज्ज्ञ गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या जयंतीनिमित्त दि.२० जानेवारी, २०२६ रोजी राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा खारेपाटण महाविद्यालयाच्या सभागृहात स.१०.०० संपन्न होणार असल्याची माहिती खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. डी. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या राज्यस्तरीय वक्तृत्व सर्धेचे हे ११ वे वर्ष असून सदर स्पर्धेसाठी १) भारतीय न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता २) मिडिया : सत्याचा आवाज की सनसनाटीचा बाजार…? ३) विकास व पर्यावरण… आरे ते तपोवन ४) भारतीय लोकशाही… एकाधिकार शाहीच्या दिशेने…? ५) विसंगती भारतीय शिक्षणव्यवस्था आणि बेरोजगारी अशा समकालीन विषयांची निवड करण्यात आली असून राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. तर या स्पर्धेकरीता प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकासाठी रोख रुपये ५०००/ व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ३०००/- रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक २००० /- रुपये व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ १००० /- रुपये व प्रमाणपत्र आदी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
तसेच या स्पर्धेमध्ये ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपली नावे प्रा.तानाजी गोदडे – ९९२१५१३८८४ व प्रा.वसीम सय्यद – ७९७२०६३३६२ यांचेकडे नोंदवावीत, असे महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा विकास होऊन त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तरी या वक्तृत्व सर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी केले आहे.












