किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली मच्छीमारी नौका आढळली जळालेल्या स्थितीत

तारकर्ली येथील भालचंद्र कुबल यांचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान

मालवण (प्रतिनिधी) : तारकर्ली वरचीवाडी येथील मच्छिमार भालचंद्र उर्फ दाजीबा जनार्दन कुबल यांची किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली मासेमारी नौका (छोटी पात) आज सकाळी जळालेल्या अवस्थेत दिसून आली असून आगीत नौकेसह नौकेतील मासेमारी जाळी व इतर साहित्य जळून खाक झाल्याने कुबल यांचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तारकर्ली किनाऱ्यावर मच्छिमार भालचंद्र कुबल यांची श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न (IND MH 5 MM 3480) ही मासेमारी नौका उभी करून ठेवण्यात आली. आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही नौका किनाऱ्यावर जळालेल्या अवस्थेत दिसून आली. नौकेतील मासेमारी जाळी व इतर साहित्य देखील जळून खाक झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नव्हते.

तारकर्ली येथील मच्छीमार भालचंद्र कुबल यांच्या मासेमारी नौकेला आग लागून नुकसान झाल्याचे समजताच शिवसेनेचे मच्छीमार सेलचे जिल्हाप्रमुख राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास कृष्णा गांवकर, साेशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मच्छिमार सेलचे तालुकाप्रमुख भाऊ माेरजे यांनी तारकर्ली येथे जाऊन सदर घटनेची पाहणी करून श्री. कुबल यांना धीर दिला. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्‍हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून लागेल ती मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. कुबल यांना दिले.

error: Content is protected !!