कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेज, कणकवली येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकदिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. २१ जून रोजी होणारा कार्यक्रम NEET परीक्षेच्या पुनर्नियोजनामुळे २२ जून रोजी घेण्यात आला. HPCL हॉल, कणकवली कॉलेज येथे सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात महाविद्यालयातील ६५ विद्यार्थी, स्वयंसेवक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योगाभ्यास, प्राणायाम तसेच योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरासाठी पतंजली योग समितीचे डॉ. रावराणे सर व कोचरेकर सर यांनी योग प्रशिक्षण देत उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यांनी नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदेही स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी कणकवली कॉलेजचे प्राध्यापक व सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम यांच्या हस्ते योग प्रशिक्षक डॉ. रावराणे सर व कोचरेकर सर यांचा कनक अंक व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. छायाचित्र ओळ : कणकवली कॉलेजमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष योग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना पतंजली योग समितीचे प्रशिक्षक.











