दहावी परीक्षेतील गैरप्रकार; २४ जण दोषी, पोलिसांकडून स्वतंत्र तपासाची शक्यता
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षा केंद्रावर झालेल्या दहावीच्या परीक्षेतील गाजलेल्या कॉपी प्रकरणात मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड (माध्यमिक विद्यालय उंबर्डे), सहाय्यक शिक्षक संजय कुमार खेमा आडे (न्यू इंग्लिश स्कूल, हेत) आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कोकण विभागीय मंडळाने तब्बल २४ जणांना दोषी ठरविले असून, त्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी या प्रकरणातील पुढील कार्यवाहीची जबाबदारी वैभववाडीचे गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांच्याकडे सोपविली होती. त्यानुसार थोरात यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, अन्य २१ जणांवरील शिस्तभंगाच्या कारवाया संबंधित संस्थाचालकांनी कराव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आपल्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत अधिक गुण मिळावेत या उद्देशाने संबंधित विद्यार्थ्याचे पालक असलेल्या मुख्याध्यापक संजय राठोड यांनी हा गैरप्रकार घडवून आणला. परीक्षा सुरू असताना राठोड आणि रिलीव्हर पर्यवेक्षक संजय आडे हे अज्ञात व्यक्तीने लिहिलेल्या उत्तरांच्या पुरवण्या परीक्षार्थीच्या वर्गाबाहेरून पर्यवेक्षकांकडे देत होते. त्या पुरवण्या मुख्य उत्तरपत्रिकेला जोडण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप कोकण विभागीय मंडळाच्या चौकशीत समोर आले आहे.
कोकण विभागीय मंडळ व माध्यमिक शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली असली तरी आता गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांकडून स्वतंत्र तपास होण्याची शक्यता आहे. या गैरप्रकाराचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या संजय राठोड यांना आणखी कोणी मदत केली होती का, याचाही तपास पोलीस करणार आहेत.विभागीय मंडळाने तिघांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी तपासादरम्यान गरज भासल्यास आणखी काही जणांवरही गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.












