मरणोत्तर नेत्रदान करून समाजासमोर ठेवला आदर्श
चौके (प्रतिनिधी) : श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे सल्लागार, सहकाराच्या माध्यमातून काळसे गावात अनेक सहकारी संस्था स्थापन करून गावच्या विकासासाठी आदर्शवत काम केलेले विष्णू दाजी प्रभू यांचे वयाच्या 82 व्या वर्षी बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सुना, एक नातू असा परिवार आहे.
व्ही. डी. प्रभु यांनी काळसे धामापूर गावातील सर्वांगीण विकासासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक विकासासाठी सदैव तत्पर राहायचे, काळसे धामापूर गावच्या जडण घडणीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या कारकिर्दीत
विष्णू दाजी प्रभू यांनी उपसरपंच, सोसायटी चेअरमन, वाचनालय चेअरमन, माऊली दूध सोसायटी चेअरमन, काळसे धामापूर प्र. मं. चेअरमन, श्री देव रवळनाथ श्री देव लिंगेश्वर देवस्थान सेक्रेटरी, खजिनदार, अशी अनेक पदे भुषविली आणि त्यांना प्रामाणिकपणे न्याय दिला. शेतकरी चळवळीत नेहमी अग्रेसर राहिले. शाळेमध्ये पोषण आहार, शेतीमधे सेंद्रिय शेती हे सरकारचे धोरणात्मक निर्णया अगोदर सरांच्या लक्षात आले होते.
श्री देवी भगवती पाणी वाटप संस्था स्थापन करण्यामागे सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे तसेच कर्लीनदी पर्यटन संस्था स्थापन करणे ही सुद्धा त्यांच्याच दुरदृष्टी चे फलित आहे. मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्पही व्ही. डी. प्रभु यांनी केला होता. त्यानुसार निधनानंतर त्यांचा नेत्रदानाचा निर्णय कुटुंबियांकडून अंमलात आणण्यात आला आणि व्ही. डी. प्रभु यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्र दान करण्यात आले. अशाप्रकारे निधनानंतरही सरांनी समाजाला आदर्श घालून दिला. व्ही. डी. प्रभु यांच्या जाण्याने काळसे गाव एका शिक्षण तपस्व्याला मुकल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.











