कणकवलीत साहित्य, संगीत संमेलन उत्साहात
कणकवली (प्रतिनिधी) : समाजात सध्या विकृती, विखारीपणाचे वातावरण तयार झाले. या वातावरणाचे विष माणसांच्या मनात चढत आहे. हे विष उतरविण्याचे औषध हे साहित्य आणि संगीतच आहे. कोकणातील मंडळीही कष्टाळू आणि कलाप्रेमी आहे. कोकणातील कातळशिल्पांचा इतिहास मोठा आहे. हा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. कातळशिल्पांचा ठेवा आणि इतिहास कोकणातील माणसांनी जतन करून ठेवला पाहिजे. जेन झी पिढीही सोशल मीडियावर फार अॅटिव्ह आहे. या पिढीला पालक व शिक्षकांनी साहित्य वाचून दाखवले पाहिजे. त्यामुळे त्यांना साहित्याचे बाळकडू मिळले. भूमी, भूतकाळ, भोवताल, भाषा चांगला असेल तर चांगला माणूस घडतो, असे मत साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षा तथा साहित्य अभ्यासक, संगीत संशोधक डॉ. निर्मोही फडके यांनी व्यक्त केले.
साहित्य संगीत मित्र मंडळ, सिंधुदुर्गतर्फे कणकवली येथील मराठा मंडळाच्या सभागृहात दुसरे साहित्य संगीत संमेलन आयोजित केले होते. याचे उद्घाटन डॉ. फडके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, कवी तथा साहित्यिक अजय कांडर, सेवानिवृत्त अधिकारी हरि चव्हाण, संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. फडके म्हणाल्या, कोकण हा निर्सगरम्य प्रांत आहे. निर्सगाची भाषा एकच असते. निर्सग आपल्याला खूप काही शिकवतो. कोकणातील मंडळींनी देशात नाट्यपरंपरचे बीज रोवले आहे. कोकणातील भूमी, भूतकाळ, भवताल, भाषा चांगली आहे. त्यामुळे या प्रांतातील व्यक्ती चांगला माणूस घडतो. कवी व साहित्यिक मंडळी समाजातील घडणाºया घडामोडींवर कविता किंवा साहित्य लिहून समाजाचे प्रबोधन करतात. मात्र, समाजप्रबोधानाच्या कार्यात सर्वसामान्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
जेन झी पिढीला सोशल मीडियावर अॅटिव्ह राहण्यात जास्त रस आहे. मात्र, त्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवायचे असेल तर पालक व शिक्षकांनी त्यांना कविता किंवा साहित्य वाचून दाखवले पाहिजे. या कृतीमुळे त्यांना साहित्याचे बाळकडू मिळेल. ६ ते १६ वयोगटातील मुलांच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. या वयोगटातील मुलांची आकलन शक्ती वाढण्यासाठी त्यांच्या मेंदूला चांगला खुराक देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना पालकांनी वाचनाची, लिहण्याची सवय लावली पाहिजे. इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाºया मुलांशी पालकांनी मातृभाषेत संवाद साधून त्यांच्यावर भाषेचे संस्कार केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
संगीत व सर्व कला साहित्याचा आत्मा आहे. साहित्य व संगीत जीवंत प्रवास असून या प्रवासाचे वाटेकरी प्रत्येकाने झाले पाहिजे. निर्सगाला कोणत्याही सीमा व विचारधारा नसते, याचे भान प्रत्येकाला असले पाहिजे. समाजप्रबोधन करणे हे कवी व साहित्यिकांचे उत्तरदायित्व असेल तर त्यांच्या कार्याला समाजाने पाठबळ दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी हरी चव्हाण, अजय कांडर, संध्या तांबे यांनी विचार मांडले. प्रास्ताविकात सुभाष भंडारे यांनी हे संमेलन आयोजित करण्यामागील मंडळाचा उद्देश सांगितला. आरंभी मान्यवरांचे स्वागत महेंद्र चव्हाण यांनी केले. मंडळातर्फे जाहीर झालेला मैत्र पुरस्कार लेखक संजय तांबे, मैत्र संगीत पुरस्कार श्याम तेंडोलकर यांना मान्यवरांनी प्रदान केला. आरंभी श्याम तेंडोलकर यांच्या संगीत मैफल झाली. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












