राजरोस जड वाहतूक पर्यायी तयार केलेल्या रस्त्याने सुरू! आर्थिक उलाढालीची शक्यता !
एसटी बंद होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार — पालक. !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : एसटी वाहतूक, पर्यटकांच्या चार चाकी आणि दुचाकी गाड्यांच्या वाहतुकीसाठी नदीतून मातीच्या भरावाने तयार केलेल्या रस्त्याची तपासणी झाल्यानंतर, तारीख २८ जानेवारीपासून फोंडाघाट ग्रामपंचायत लगतचा ब्रिटिश कालीन पूल – ब्रिज पाडण्याचे काम, ठेकेदारांनी सुरु केले. बांधकाम विभागाच्या तारीख २३- ०१- २६ पत्राने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तारीख २४- १२- २५ च्या पत्राप्रमाणे, एसटी, दुचाकी आणि पर्यटकांच्या चारचाकी गाड्या नवीन तयार केलेल्या नदीतील तात्पुरत्या रस्त्यावरून वाहतूक करण्यास स्थानिक प्रशासनास अधिकार दिले होते. व इतर ट्रॉलर्स, कंटेनर्स, चिरा- वाळू ट्रक इत्यादी जड वाहतूक गगनबावडा- वैभववाडी मार्गे कोल्हापूर आणि फोंडा घाटमार्गे येणारी वाहतूक हरकुळ- कनेडी – कणकवली मार्गे वळविली होती. त्याप्रमाणे ब्रिजच्या दोन्ही बाजूस चालकांसाठी दर्शनी फलकही लावले आहेत. आणि त्या ठिकाणी जड वाहतूक वळविण्यासाठी वॉचमन ठेवले आहेत ..
मात्र जड वाहतूकदार या वॉचमनशी भांडण काढतात. काही उडाणटप्पू पैशाची मागणी करून जड वाहतूकदारांना नदी रस्त्यातून जाण्यास सवलत देतात. येथून जवळच पोलीस चेक पोस्ट आहे. त्यांच्यासमोर राजरोज ही वाहतूक होत आहे. अर्थात त्यांनी हे आपले काम नसल्याचेही सांगितले. पोलिसांचेही हे वाहन चालक ऐकून ऐकत नाहीत. ग्रामपंचायतमधील सीसी टीव्ही फुटेज वरून या मागील सूत्रधार पकडता येईल.. याबाबत ठेकेदार यांनी गावात ग्रामस्थांमध्ये भांडणे लावण्यापेक्षा कठोर धोरण अवलंबून जड वाहतूक त्वरित बंद करावी. अशी मागणी होत आहे…
रस्ता जड वाहतूकी मुळे नादुरुस्त झाल्यास हसणे, डाजीपुर पासून फोंडा हायस्कूल कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा संभव आहे. आणि या नुकसानीस ठेकेदार, बांधकाम विभाग जबाबदार राहील. अशी बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली आहे. तसेच गावातील स्थानिक पुढाऱ्यांचेही लक्ष वेधले आहे …
फोंडा गावातील सा. क्र ५२/७५० व ५२/ ९५० मधील डांबरीकरण व काँक्रीट गटर्स चे काम पूर्ण झाल्याने पुलाची कामे करणे बाकी आहे. असे पत्र तारीख ०७ – ०१ – २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाहतूक वळविण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. मात्र गावातील डांबरीकरण व काँक्रीट गटर्सचे काम अजूनही अपूर्ण असताना, लोकांना अंधारात ठेवून, ब्रिज पाडण्याची व त्यातून जड वाहने वळवून होणाऱ्या भ्रष्टाचाराची घाई का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. शिवाय याकडे ग्रामपंचायत स्थानिक नेते व उमेदवारांचे लक्ष का नाही ? अशी विचारणा होत आहे.












