तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण यांनी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी शाळेचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेमध्ये शाळेची स्वच्छता, हरित परिसर, भित्तीचित्रे, शैक्षणिक साधनसामग्रीची मांडणी, विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच एकूणच शैक्षणिक वातावरण यांचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यालयाने नियोजनबद्ध प्रयत्न, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे यश मिळवले. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण, मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शाळेचा परिसर आकर्षक व सुशोभित करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
यावेळी तालुका स्तरावरून किशोर गवस (गटशिक्षणाधिकारी कणकवली), नारायण ओटवकर (केंद्रप्रमुख नांदगाव विभाग), गोपाळ जाधव (केंद्रप्रमुख, खारेपाटण विभाग), प्रदीप श्रावणकर (मुख्याध्यापक, खारेपाटण केंद्र शाळा) यांनी शासकीय निकषानुसार प्रशालेतील शैक्षणिक सुविधा व कागदपत्रे यांची पाहणी केली. यावेळी प्रशालेच्या वतीने अजय गुरसाळे यांनी उपस्थित मान्यवरांना इंटरऍक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून सादरीकरण केले.
प्रशालेच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त यांनी प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी ही विद्यालयाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील ओळख अधिक दृढ झाली आहे.












