प्रयास-सेवांकुर संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांची गोपुरी आश्रमास भेट

गोपुरी आश्रमाच्या कामाबद्दल व्यक्त केले समाधान

कणकवली (प्रतिनिधी) : सद्य काळात विचार आणि तत्वे आबाधित राखून काम करणाऱ्या संस्थांचे प्रमाण घटत चालले असताना कोकणचे गांधी पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांचा तळागाळातील माणसाच्या उन्नतीचा विचार घेऊन युवा मंडळी कार्यरत आहेत ही भविष्याकरिता अत्यंत समाधानाची बाब आहे, असे भावोद्गार प्रयास-सेवांकुर संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी काढले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॅन्सर’ आजारा संदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी ते आले होते. आज त्यांनी आवर्जून गोपुरी आश्रमाला भेट दिली. गोपुरी आश्रमाच्या कामा संदर्भात माहिती घेतली. यावेळी गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत, संचालिका अर्पिता मुंबरकर, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. शामिता बिरमोळे आणि सावजी यांचे सहकारी उपस्थित होते.

सावजी पुढे म्हणाले की आज मानवतेचे तत्त्व आणि तत्त्वनिष्ठ विचारांच्या कृतीसाठी युवा वर्गाने पुढे यायला हवे. युवा पिढीच्या अस्तित्वावर सक्षम समाजाची धुरा अवलंबून आहे. याकरिता गोपुरी आश्रमासारख्या संस्था जिवंत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आहे. माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठीचे विचार भावी पिढी समोर ठेवणे ही सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. यात गोपुरी आश्रमाचा सक्रिय सहभाग आहे याचा मला विशेष आनंद वाटत आहे, असेही डॉ. सावजी म्हणाले.

error: Content is protected !!