नाधवडेत भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत उत्साहात
वैभववाडी (प्रतिनिधी) : बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित बैलगाडा शर्यत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे वेगळा अनुभव व वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झाले आहे. शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी दिसत आहे. या शर्यतीचा आनंद प्रत्येकाने जरूर घेतला पाहिजे. परंतु शर्यतीतील पाळीव प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी देखील घेतली पाहिजे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत नाधवडे येथील मैदानावर पार पडली. यावेळी नितेश राणे यांनी स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत एकूण 70 बैलगाड्यांची नोंदणी करण्यात आली होती.याप्रसंगी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे,जयेंद्र रावराणे, बाप्पी मांजरेकर, जि. प. सदस्य श्रावणी रावराणे, जि. प. सदस्य रिद्धी सुतार, प्रकाश पारकर, बंडया मांजरेकर, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, पं. स. सदस्य साची कोलते, सुवर्णा संसारे, दिलीप तळेकर, मंगेश लोके, देवानंद पालांडे, हुसेन लांजेकर, राजेंद्र राणे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडी स्पर्धा मोठ्या प्रमाणात होते. या स्पर्धेवर गेल्या अनेक वर्ष बंदी होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ही बंदी उठवण्यात मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे पथक याठिकाणी आहे.स्पर्धा या झाल्याच पाहिजेत परंतु स्पर्धेतील मुक्या जनावरांची देखील आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. असे सांगितले. या स्पर्धेत सहभागी सर्व बैलगाडा मालकांना तसेच बंड्या मांजरेकर मित्रमंडळाला त्यांनीशुभेच्छा दिल्या.
उद्यापासून मुंबई ते विजयदुर्ग अशी पहिली रो रो सर्विस सुरू होत आहे. ही सेवा जिल्ह्यासाठी निश्चित लाभदायी ठरेल. असे नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी बंड्या मांजरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. बंड्या मांजरेकर मित्रमंडळाच्या वतीने नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टक्के यांनी तर आभार बाबा कोकाटे यांनी मानले.












