उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अक्षता कांबळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : महिला दशावतार सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या, पुरुषप्रधान संस्कृती मोडीत काढीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रा बरोबर समाजसेवा करत महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व कोकण विभाग अध्यक्षा सुनीता गणगे, मुंबई-पुणे विभाग प्रमुख लक्ष्मण मानकर यांनी घेतली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च २०२६ रोजी पुं. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्यगृह) प्रभादेवी मुंबई येथे पुरस्कार प्रधान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र मधून विविध क्षेत्रातील महिला पुरस्कारसाठी आल्या होत्या. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्षता कांबळी पहिल्या मानकरी ठरल्या. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, मानाची शाल, सावित्रीबाईच पुस्तक आणि भेटवस्तु असा ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. अक्षता कांबळी यांना शासनाचा जिल्हास्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार ही जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांसाठी सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. या पुरस्कारांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व कर्मचारी यांचे अक्षता कांबळी यांनी मन:पूर्वक आभार मानले.












