नडगीवे नं. १ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीदूतांची उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा नडगीवे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे कृषीदूत सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शाळेच्या सभागृहात दीपप्रज्वलनाने झाली.मुख्याध्यापिका अनिता नरेंद्र पाटकर यांच्या हस्ते तसेच शिक्षकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी योगगीता सादर करून कार्यक्रमाला सकारात्मक वातावरण निर्माण केले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका पाटकर यांनी आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत असल्याचे सांगितले. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून जीवनशैली असल्याचे नमूद करत नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य योग सत्राचे संचालन शिक्षक संदीप कदम तसेच कृषीदूत प्रतीक रेगे,अजय सूर्यवंशी, शिवप्रताप देसाई, विघ्नेश सुर्वे, रितेश शिंदे, श्रीदत्त कदम, किशोर पाटील आणि अक्षय शिंदे यांनी केले. आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या ‘कॉमन योग प्रोटोकॉल’नुसार ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन आणि भुजंगासन या योगासनांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले. प्रत्येक आसनाचे आरोग्यदायी फायदे व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी या प्राणायामांचा सराव करण्यात आला. मार्गदर्शित ध्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मानसिक शांततेचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतःच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी दररोज किमान २० मिनिटे योग करण्याची सामूहिक शपथ घेतली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका अनिता पाटकर, प्रभा अकिवाटे, संदीप कदम, जान्हवी परब तसेच कृषीदूतांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!