भाजपा हरकुळ ( खुर्द ) विभाग आणि जि प सदस्य मनोज रावराणेंचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द, गांधीनगर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत हरकुळ खुर्द व गांधीनगर येथील सुमारे 650 कुटुंबांना तब्बल 12 हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन करावे, कुटुंबांचा खर्च कमी व्हावा आणि पोषक आहार उपलब्ध व्हावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
भाजीपाला रोपांच्या वाटपासोबतच रोपांची योग्य वाढ होण्यासाठी खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, पाणी नियोजन तसेच पीक संवर्धन याबाबत पत्रक देखील देण्यात येणार आहे.
तसेच हरकुळ बुद्रुक येथील गरजू ग्रामस्थांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणार असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारे हे सामाजिक उपक्रम नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला उपयुक्त ठरणार असून समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.












