सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य आंबा-काजू बागायतदारांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथे सिंधुदुर्ग आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या वतीने विविध पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना भेटून आवाहन पत्र देण्यात आले. यावेळी महासंघाचे शरद परब, अजय तेली, तुषार पाळेकर, किरण टेम्बुलकर, गणेश वाळके, चंदन मामघाडी, नीरज घाडी आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब तसेच काँग्रेसचे अभय शिरसाट यांना आवाहन पत्र देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार अत्यंत गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, वाढलेले उत्पादन खर्च, बाजारातील दरांची मोठी घसरण यामुळे बागायतदार पूर्णपणे हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पुढील मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली:
आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने जाहीर करून वितरण करावे काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रुपये आर्थिक मदत तातडीने जाहीर करून वितरण करावे पिकासाठी घेतलेले कर्ज गोठवून कर्जमाफी योजनेत समाविष्ट करावे देवगड आंबा संशोधन केंद्र आधुनिक तंत्रज्ञानासह कार्यान्वित करावे बनावट औषधे व खत कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आंबा व काजू उत्पादनाला हमीभाव जाहीर करावा या सर्व मागण्यांसाठी सिंधुदुर्ग आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या वतीने दिनांक १२ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी या मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि स्वतः मोर्चात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले











