खांबाळे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महिलांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; नारी शक्तीचा सन्मान सोहळा

वैभववाडी (प्रतिनिधी) : महिला आज शिक्षण, प्रशासन, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या रिद्धी रितेश सुतार यांनी केले. सहेली महिला ग्रामसंघ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त खांबाळे केंद्रशाळा येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब (जिजाबाई भोसले), छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीत महिलांच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी पेटीवादक सुहास सुतार व ढोलकीवादक कैवल्य पवार यांनी संगीताची साथ दिली. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली.

महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महिला सर्वच क्षेत्रांत भरारी घेत आहेत, असे त्यांनी नमूद केले. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कुटुंब सक्षमपणे सांभाळावे तसेच मुलांना चांगले संस्कार देऊन उद्याची सुसंस्कृत पिढी घडवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कोकिसरे जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, वाभवे-वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, खांबाळे माजी सरपंच प्राजक्ता कदम, मुख्यसेविका मनस्वी कांबळे, पोलीस हवालदार आरती राठोड, पोलीस पाटील अस्मिता चव्हाण, राखी पवार, सहेली ग्रामसंघ अध्यक्षा सुनीता पवार, कोषाध्यक्षा उमा कदम, खांबाळे केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये, ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे, आरोग्य सेविका सेजल कुवळेकर तसेच कृषी सहाय्यक मीनाक्षी भुजंग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यसेविका मनस्वी कांबळे, मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये तसेच पोलीस हवालदार आरती राठोड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर संबोधन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहेली महिला ग्रामसंघ सचिव विशाखा पाताडे, लिपिका संचिता गुरव, सी.आर.पी. सुप्रिया मोहिते, सुप्रिया साळुंखे, प्राची लोके, अंगणवाडी सेविका धनश्री राजेंद्र देसाई, पूजा परशुराम गुरव, पूजा लवू पवार, आशा सेविका शामली देसाई, प्राची एकनाथ पवार तसेच सुप्रिया लोके यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी ‘नारी शक्तीचा – गौरव स्त्री शक्तीचा’ या संकल्पनेतून वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिला, सामूहिक व्यवसाय करणारे महिला बचत गट, गावातील सामाजिक कार्यात सहभाग घेणाऱ्या महिला, सहेली महिला ग्रामसंघ पदाधिकारी, माजी सरपंच महिला तसेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कार्यरत महिलांचा महिला सन्मान सोहळा आयोजित करून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. “माऊली ही कुटुंबाचा आधारस्तंभ असून तिच्या संस्कारांमुळेच समाजात सुसंस्कृत पिढी घडत असते.” खांबाळे पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या मातोश्री जयश्री लोके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना विशाखा पाताडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका धनश्री राजेंद्र देसाई यांनी केले.

error: Content is protected !!