जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन महिला मंडळाचा उपक्रम : बाईक रॅलीसह गुणवंत विद्यार्थी व कष्टकरी महिलांचा गौरव…!
कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन महिला मंडळातर्फे हर्णे आळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत भावना हर्णे यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. वंदना हजारे यांनी द्वितीय तर वैष्णवी ठाणेकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सुप्रिया हर्णे व संजना सांडव यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. हर्णे आळी व तेलीआळी मर्यादित या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ महिला शीला हर्णे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांच्यासह स्नेहा हर्णे, अन्वी हर्णे, योगिता हर्णे, विद्या हर्णे, अपर्णा आरोलकर, संगीता वराडकर, अंकिता हर्णे, चित्रा हर्णे, वैशाली सांडव, आशा आमने, सिंधू ठाणेकर, रेश्मा हर्णे, भारती हर्णे आदी उपस्थित होते. हर्णे आळी व तेली आळी येथील महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण म्हणून सुधीर हर्णे, श्रीकृष्ण ठाणेकर व भूषण हर्णे यांनी केले.
स्पर्धेनंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच येथील गुणवंत विद्यार्थी दुर्वा ठाणेकर, राज्ञी हर्णे, परी सांडव, भूवी हर्णे, तिथी हर्णे व जिविका सांडव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याचवेळी पतीच्या निधनानंतर कष्ट करून कुटुंब उभे करणाऱ्या जेष्ठ महिलांमध्ये मनोरंजना हर्णे, शीला हर्णे, सिंधू ठाणेकर, भारती हर्णे, कुंदा हर्णे, वनिता हर्णे, वैशाली सांडव, वासंती हर्णे व आशा हर्णे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक १२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल मनस्वी ठाणेकर यांचा भारती हर्णे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सुदर्शन महिला मंडळातर्फे शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. हर्णे आळी येथून सुरू झालेली ही रॅली ढालकाठी, बाजारपेठ, डीपी रोड मार्गे पुन्हा हर्णे आळी येथे येऊन समाप्त झाली. या रॅलीने परिसराचे विशेष लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. कार्यक्रमाला महिलांसह पुरुष वर्गाचीही मोठी उपस्थिती लाभली.











