भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत ‘फार्मा अन्वेषण २०२६’चे आयोजन….

पीसीआयतर्फे शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्र एकत्र आणणारा उपक्रम….

बांदा (प्रतिनिधी) : फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फार्मसी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संशोधन कार्याला पाठिंबा देण्यासाठी व त्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पीसीआयने हा उपक्रम सुरु केला आहे.

देशातील फार्मास्युटिकल शिक्षणाचे जनक प्रा.एम.एल.श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन साजरा केला जातो. या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पीसीआयने यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची निवड केली. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश फार्मसी क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे हा आहे. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींच्या सहभागामुळे पेटंट व व्यापारीकरण यासंबंधीची माहिती विद्यार्थी व प्राध्यापकांना मिळणार आहे.

कार्यक्रमात अखिल भारतीय केमिस्ट व ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जशूभाई चौधरी, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, गोव्याच्या अन्न व औषध संचालनालय संचालक डॉ. श्वेता देसाई, अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे सहआयुक्त शशिकांत यादव, पीसीआय सदस्य विजय पाटील, इंडोको रेमेडीजच्या व्यवस्थापकीय संचालक आदिती कारे पाणंदीकर, वर्गो फार्माचे संशोधन प्रमुख हिमांक नार्वेकर, गोवा स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष राज वैद्य, गोवा पीसीआय सदस्य रत्नदीप कुडतरकर, कोकण विभागातील अन्न व औषध विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र व गोवा राज्यातील फार्मसीचे सर्व प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित राहणार आहेत.

यावेळी फार्मसीचे विद्यार्थी आपले पेटंट्स व संशोधन प्रबंध उद्योग प्रतिनिधींसमोर मांडणार आहेत. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील . साडेतीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य व आयोजक डॉ. विजय जगताप, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सचिन कोतवाल, कार्यकारी अध्यक्ष प्रा.प्रविण जावळे, डॉ.राजेश जगताप, सातारा समन्वयक डॉ.विक्रम शिंदे, डॉ.संदीप शेळके, भोसले फार्मसी कॉलेजचे डॉ.तुषार रुकारी, डॉ.विनोद मुळे, प्रा.सत्यजित साठे व सहकारी मेहनत घेत आहेत.

‘फार्मा अन्वेषण २०२६’च्या माध्यमातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील संवाद अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करत या उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करुन घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी केले आहे.

error: Content is protected !!